करून पहा साधे सोपे प्रयोग -
1. रूपयाभर पाणी
साहित्य – एक रूपयाचे नाणे, पेलाभर पाणी, ड्रॉपरकृती – एक रूपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये पाणी भरा. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका. त्याच्यावर आणखी थेंब पाणी टाका. नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा. बहुधा तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.पाण्याच्या थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्त्वाकर्षणापेक्षा कमी झाला की पाणी ओसंडून वाहते.
2. एकापेक्षा दोन हलके?
साहित्य – दोन सारख्या आकाराच्या उभट डब्या – झाकणासह, वाळू, एक व्यक्तीकृती – पूर्वतयारी - दोन डब्या घ्या. एका डबीत जास्तीत जास्त वाळू भरा. झाकण लावा. आता प्रयोगाला सुरूवात करा. एका व्यक्तीला तळहात पुढे करून उभे करा. त्या तळहातावर भरलेली डबी ठेवा. हातावर पडलेला भार अनुभवायला सांगा. दुसरी डबी पहिल्या डबीवर ठेवा. समोरच्या व्यक्तिला दोन्ही डब्या एकमेकींवर ठेवल्यावर भार कमी जाणवतो.दुसरी डबी ठेवली जात असताना तळहाताचे स्नायू दुप्पट भार सहन करण्याची तयारी करतात पण भार फार वाढत नाही त्यामुळे तो कमी झाल्यासारखा वाटतो.
3. वस्तूला दूध पाजा.
साहित्य – विविध प्रकारच्या वस्तू, दूध, चमचा, लाकडी फळी, फडके.कृती – एक लाकडी फळी घ्या. फळीवर स्वच्छ फडके नीट पसरा. फडक्यावर एक वस्तू स्थर राहील अशी ठेवा. एका चमच्यात चमचाभर दूध घ्या. चमच्याची कड वस्तूच्या पृष्ठभागाला टेकवा. चमचा किंचित तिरपा करा. चमच्यातले दूध हळुहळू कमी होताना दिसेल. दुधाचा पातळ थर वस्तूवरून सरकताना दिसला नाही तरी फडके दूधाने ओले झालेले दिसेल.दूधाच्या पृष्ठभागावरून थोडेसे दूध वस्तूच्या पृष्ठभागावर आले की त्यातल्या पाण्याच्या कणांच्या ओढीने चमच्यातील दूध ओढले जाते.
4. कोणता डोळा लाडका?
साहित्य – ३० मीटर पलिकडची वस्तू, तुम्ही स्वत:कृती – एका मोकळ्या जागेसमोर उभे रहा. ३० मीटर पलिकडची एक वस्तू निवडा. दोन्ही डोळे उघडे ठेवून त्या वस्तूकडे बोट दाखवा. स्थिर रहा. आधी डावा डोळा बंद करून बघा. तो उघडा. मग उजवा डोळा बंद करून बघा. कोणत्या डोळ्याने बघताना बोट आणि वस्तू एका रेषेत दिसते? तो तुमचा लाडका डोळा.प्रत्येक व्यक्तिची एक बाजू दुसरीपेक्षा सक्षम असते. काही डावखोरे असतात काही उजखोरे. तसेच डोळ्याच्या बाबतीत होते.
5. चष्मेवाल्यांना जग कसे दिसते?
साहित्य – बहिर्गोल भिग, चष्मा.कृती – दार खिडक्यांच्या विरूद्ध बाजूला असलेल्या भिंतीवरची अंधारी जागा निवडा. एक बहिर्गोल भिंग त्या जागेसमोर उभे धरा. ते पुढे मागे करत भिंतीवर समोरच्या दार खिडकीची स्पष्ट प्रतिमा मिळवा. ती उलटी दिसेल. आता भिंगाच्या पुढे चष्म्यातले एक भिंग धरा. प्रतिमा धूसर होईल. दोन्ही भिंगात तेवढेच अंतर राखत दोन्ही भिंगे पुढेमागे करत भिंतीवर स्पष्ट प्रतिमा मिळवा. आता फक्त चष्मा काढून घ्या. भिंतीवर पडलेली धूसर प्रतिमा दिसते तसे जग त्या चष्मेवाल्याला दिसते.डोळ्याच्या भिंगाने प्रतिमा धूसर दिसते म्हणून चष्म्याचा आधार घ्यावा लागतो.
6. गव्हांकुराची वाढ.
साहित्य – चौकोनी ट्रे, माती, पाणी, रांगोळी, गहू, गव्हाची चाळणी.कृती – साधी माती गव्हाच्या चाळणीने चाळून घ्या. ट्रे मध्ये तिचा थर एक-दिड सेंटीमीटर व्हायला पाहीजे. मातीवर पाणी शिंपडा. रांगोळीने दर २ सेंटीमीटर अंतरावर अधिकची खूण करा. त्यांनी बनवलेल्या कोपर्यातल्या चौरसात दोन गहू पेरा. पुढे दर ४ तासांनी एकेका चौरसात दोन गहू पेरा, थोडे पाणीही शिंपडा. शेवटच्या चौरसात पेरलेल्या गव्हाला मोड आल्यावर प्रत्येक गव्हांकुराची उंची मोजा.ती वेळेनुसार वाढली आहे का?
7. साखरेतून उजेड .
साहित्य – जाड साखर, फरशी, बत्ताकृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक गुळगुळीत फरशी घ्या. ओटा किंवा दगडी पोळपाट चालेल. त्याच्यावर थोडी साखर पसरा. हातात बत्ता घ्या. पूर्ण अंधार करा. बत्त्याने दाबत साखर चुरडा. चुरडताना निळसर उजेड पडलेला दिसेल.साखरेचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयन अडकून पडलेले असतात. साखर चुरडताना ते हवेशी संपर्कात येतात. त्यांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.
8. दुरून पेटणारी मेणबत्ती
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी.कृती – एक मेणबत्ती घ्या. स्टॅंडवर किंवा बशीत किंवा पक्क्या आधारावर ठेवा. काड्यापेटीने मेणबत्ती पेटवा. तिची ज्योत चांगली स्थिर होऊ द्या. मेणबत्ती एकाच फुंकरीत पटकन् विझवा. मेणबत्तीच्या विझलेल्या ज्येतीतून एक धुराची रेषा वर गेलेली दिसेल. ती रेषा अखंड असतानाच एक काडी पेटवून धुराच्या रेषेच्या टोकाला लावा. एक बारीक ज्योत मेणबत्तीच्या वातीपर्यंत जाताना दिसेल. मेणबत्ती पुन्हा प्रज्वलीत होईल. धुराची रेषा अखंड नसेल तर तसे होणार नाही.मेणाचा धूर किंवा कोणतीही गोष्ट पेटण्यासाठी तिचे तापमान पेट घेण्यालायक असायला लागते शिवाय एक ज्योत किंवा ठिणगी तरी लागते.
9. कागदी पट्टीचा झुकता पूल
साहित्य – कागद, कात्री, पट्टी, डिंक, पुठ्ठाकृती – कागदाची १५ सेंटीमाटर लांब आणि २ सेंटीमीटर रुंद आकाराची पट्टी कापून घ्या. दोन्ही टोकांपासून एक सेंटीमीटर अंतरावर पट्टी दुमडून घ्या. दुमडलेल्या भागांना एका बाजूने डिंक लावून ती टोके पुठ्ठ्यावर चिकटवा. त्याच्यातील अंतर ७ ते ८ सेंटीमीटर राहील असे पहा. कागदाच्या या कमानीखालून लांब फुंकर मारा. कमान वर न जाता खाली जाते.फुंकरीमुळे कमानीखाली हवेचा दाब कमी होतो व ती ढकलली जाते.
10. पांढरा बगळा होई काळा
साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.कृती - ५ सेंटीमीटर लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने बगळ्याची रेखाकृती काढा. डोळा काळा रंगवा. बगळा सोडून बाकी पूर्ण कागद काळ्या रंगाने रंगवा. बगळ्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला बगळ्याची रेखाकृती काळी दिसेल.आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या पांढर्या रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग कमी प्रकाश पाहतो म्हणून तो भाग काळा झाल्यासारखा वाटतो.
11. रंग वाचता येतात की शब्द?
साहित्य – कोरा कागद, पेन्सिल, रंगीत खडू किंवा ब्रश - रंगकृती – एक कोरा कागद घ्या. त्यावर पेन्सिलिने मोठ्या पुसट अक्षरात तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे लिहा. ती नावे कोणताही दुसरा रंग वापरून ठळक करा. उदा. लाल हा शब्द काळ्या रंगाने रंगवा. सर्व अक्षरे वेगळ्या रंगांनी रंगवून झाल्यावर. शब्द न वाचता रंग मोठ्याने वाचून दाखवायला इतरांना सांगा.आपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो असे आढळते.
लाल पिवळा निळा हिरवा तपकिरी नारिंगी जांभळा
12. मोहरीच्या दाण्यांचा नाच
साहित्य – मोहरी, प्लॅस्टिकची पिशवी, पिना भरलेला स्टेपलर.कृती – एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. मोहरीच्या दाण्यांनी पिशवी अर्धी भरा. पिशवीचे तोंड दोन घड्या घालून बंद करा. त्यावर स्टेपलरने आवश्यक तितक्या पिना मारा. पिशवीचे एक टोक एका हाताच्या चिमटीने उचला. त्याच्या विरूद्ध असलेले पिशवीचे टोक दुसर्या हाताच्या चिमटीने पकडा. पिशवी डोळ्यांसमोर धरून हळुहळू गोलाकार फिरवा. पिशवीतले मोहरीचे दाणे नाचताना दिसतील.पिशवी फिरवताना होणार्या छोट्याश्या घर्षणानेही स्थिर विद्यूत तयार होते.
13. टिव्हीला ट्रांझिस्टर लावला तर..
.साहित्य – टिव्ही संच, ट्रांझिस्टरटिव्ही चालू करा. एलईडी, एलसीडी टिव्ही चालणार नाही लांबट असलेलाच हवा. एक ट्रान्झिस्टर घ्या. मोडका, बंद असलेलाही चालेल. त्यात सेल नसले तरी चालेल. तो हळुहळू चालू टिव्ही संच्याच्या पडद्याजवळ न्या. काही ठिकाणी पडद्यावरचे रंग, आकार बदललेले दिसतील.टिव्ही संचातील किरण म्हणजे जोरात फेकले गेलेले इलेक्ट्रॉन असतात. त्यांचा मार्ग चुंबकीय क्षेत्रामध्ये बदलतो.
14. भेटीची आस बोटांना
साहित्य – आपले हातदोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफा. पकड घट्ट ठेवा. दोन्ही हाताच्या अंगठ्या शेजारची बोटे सरळ करून ताणा. त्यांची टोके एकमेकांना जोडा. नंतर त्यांच्यात सुमारे एक सेंटीमीटर अंतर ठेवून निरीक्षण करा. बोटे एकमेकांकडे आपोआप ओढली जातील. ती वेगळी ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात.वक्र झाल्यावर बोटातले स्नायू नैसर्गिकपणे पकड मजबूत करू बघतात.
15. रंगीत स्क्रीनवरचे कोश
साहित्य – पाणी, रंगीत पडदा असलेले उपकरण – टिव्ही, मोबाईल, टॅब, संगणक इ.रंगीत पडदा असलेले एक उपकरण घ्या. ते चालू करा. एका हाताच्या चिमटीत पाणी घ्या. रंगीत स्क्रीनजवळ चिमूट नेऊन किंचित सैल करा. तोंडाने पाण्यावर जोरात फुंकर मारा. पाण्याचे काही शिंतोडे स्क्रीनवर पडतील. त्यातून स्क्रीनवरचे कोश पहा. मान थोडी हलवून त्यांचे रंग तपासा.कोश लाल, हिरवा, निळा या तीन रंगांचेच असतात.
16. कावळा काळा तरी दिसे पांढरा
साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.कृती - ५ सेंटीमीटर लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने कावळ्याची रेखाकृती काढा. डोळा सोडून बाकी पूर्ण कावळा काळ्या रंगाने रंगवा. त्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला कावळ्याची रेखाकृती पांढरी दिसेल.आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या काळ्या रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग अधिक प्रकाश पाहू शकतो म्हणून तो भाग पांढरा झाल्यासारखा वाटतो.
17. भात निळा करणे.
साहित्य - शिजवलेला भात, लिंबू, आयेडाइज्ड मीठ, ताटली, डाव, छोटा चमचा, सुरी.कृती - सुरीने कापून लिंबाच्या फोडी करून एका ताटलीत कडेला ठेवा. ताटलीत एक डावभर शिजवलेला गरम भात घ्या. त्याच्यावर छोटा चमचाभर आयोडाइज्ड मीठ टाका. त्याच्यावर लिंबाच्या रसाचे तीन थेंब टाका. थोडा वेळ गडद निळी रंगछटा दिसेल.मीठातील आयोडीनची भातातील पिठूळ पदार्थाशी रासायनिक क्रिया होऊन निळ्या रंगाचे अस्थिर संयुग तयार होते.
18. बदलत्या रंगाचे कुंकू
साहित्य – लाल कुंकू पूड. चमचा, रुमाल, ज्योत. कागद.कृती - एका चमच्याच्या अर्ध्या दांडीला रुमाल गुंडाळा. त्या चमचात अर्धा चमचा भरेल इतकी लाल कुंकवाची पूड घ्या. चमचातील कुंकू ज्योतीवर घरून तापवा. ते काळे पडेल. हे काळे पडलेले कुंकू कागदावर ओता. थोड्या वेळात ते पुन्हा लाल होईल.उष्णतेमुळे कुंकवातील जल निघून जाते म्हणून ते काळे पडते गार होताना हवेतील बाष्प शोषून ते जलभरण करते त्यामुळे पुन्हा लाल होते.
19. हळदीचे कुंकू, कुंकवाची हळद
साहित्य – हळद पूड, पाणी, खायचा चुना, लिंबाची फोड.कृती - हळदीची चिमूटभर पूड हातावर ठेवा. त्यावर थोडे पाणी घाला. हातावर हात चोळून हळदीची पिवळा रंग हातभर पसरू द्या. कणीभर खायच्या चुना हळद लावलेल्या हातावर ठेवा. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात कुंकवासारखे लाल होतील. आता त्यावर दोन थेंब लिंबू रस टाका. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात पुन्हा पिवळे होतील.हळदीचा रंग आम्लारी पदार्थामुळे लाल होतो तर आम्लामुळे पिवळा.
20. साखरेचा खाद्य रंग
साहीत्य - साखर, एक डाव, छोटी कढई, चिमटा, चूल, गॅस किंवा स्टोव, लांब दांडाची चमचा, कृती - छोटा चमचा, डबी लागेल. चूल पेटवा तिच्यावर छोटी कढई ठेवा. ती तापू द्या. तिच्यात साखरेचे २-३ दाणे घाला. साखरेचे दाणे थोडे वितळल्यासारखे दिसले की तिच्यात डावभर साखर घाला. कढई चिमट्याने पकडून छोट्या चमच्याने साखर हलवा. साखर वितळत जाईल तसतसा खमंग वासाचा एक तांबूस करपट रंग येतो. त्याला कॅरॅमल म्हणतात. कढई चुलीवरून उतरवून गार झाल्यावर कॅरॅमल नंतर वापरण्यासाठी डबीत भरून ठेवा.साखरेचे कण अर्धवट जळल्यामुळे, अर्धवट वितळल्यामुळे, त्यांच्या मिश्रणामुळे हा रंग तयार होतो.
21. कर्ब वायू ओतणे
साहित्य – पाणी, खाण्याचा सोडा, लिंबू. साधने – मेणबत्ती, काड्यापेटी, खोलगट तसराळे, बाटली.कृती – एका बाऊलमध्ये किंवा खोलगट तसराळ्याच्या आत एक छोटी मेणबत्ती पेटवून ठेवा. एका बाटलीत थोडे पाणी घेऊन त्यात थोडा खाण्याचा सोडा विरघळवा. त्याच्याच थोडा लिंबाचा रस घाला. फसफसण्याची क्रिया सुरू होईल. ती थोडी कमी झाल्यावर पेटलेल्या मेणबत्तीच्या पात्रात बाटलीतील वायू ओता. बरोबर ओतलात तर मेणबत्ती विझेल.कर्बवायू हवेपेक्षा जड असतो म्हणून ओतला जातो.
*माहितीस्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे*
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
https://www.facebook.com/106479051303040/posts/110970550853890/
No comments:
Post a Comment