Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 25, 2021

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, उत्कृष्ट संसदपटू व कवि, लेखक, पत्रकार, संपादक कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏* *( २५ डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील लेखमाला एकूण 5 भागात खास आपल्यासाठी

*भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, उत्कृष्ट संसदपटू व कवि कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏* 
*( २५ डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील लेखमाला एकूण 5 भागात खास आपल्यासाठी...)* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग एक )* 

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत. मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. 

ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींचा एका छोट्या राजकीय कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा झालेला प्रवास  थक्क करणारा आहे. त्यांचे वडील कृष्णबिहारी हे संस्कृत,हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचे उत्तम जाणकार तर होतेच, पण ते प्रख्यात कवीही होते. त्यांचेच काव्यगुण जणू वारशाच्या रूपाने अटलजींमध्ये उतरले. कृष्णबिहारी हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या करड्या नजरेखाली अटलजींचे बालपण गेले. 

अटलजींच्या कवितांचं जेव्हा जेव्हा कौतुक केलं जाई, तेव्हा तेव्हा ते त्याचं सारं श्रेय आपल्या वडलांना देत असत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही असे ते म्हणायचे. अटलजींचं नावही मोठं अर्थपूर्ण आहे. अटलबिहारी या नावातच विरोधाभास आहे. अटल म्हणजे न ढळणारा आणि बिहारी म्हणजे स्थिर नसलेला किंवा भ्रमण करणारा. राजकारणाच्या क्षेत्रातला हा अढळ तारा होता, आणि साहित्याच्या प्रातांत सतत मुशाफिरी करणारे हे व्यक्तिमत्व होते. अटलजींच्या बालपणीच्या आठवणी या त्यांच्या निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या छोट्याशा बटेश्वर गावाशी निगडित आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी जागवताना ते तेथील वातावरणाचा अतिशय रम्य उल्लेख करतात. ' आओ मनकी गाठे खोले ' या कवितेत ते म्हणतात, 

यमुना तट, टिले रेतीले 

घास फूस का घर डाँडे पर,

गोबर से लीपे आँगन मे, 

तुलसी का बिरवा, घंटी स्वर 

माँ के मुहसे रामायणके दोहे- चौपाई रस घोले !

आओ मनकी गाठे खोले !

अटलजींच्या कवितेत तेथील वातावरण खऱ्या अर्थाने जिवंत होते. वडिलांच्या काव्यगुणांचा वारसा अशा रीतीने त्यांच्याकडे आला. अटलजींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. त्यांची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि साध्या स्वभावाची गृहिणी होती. मात्र ती सुगरणही होती. आईच्या हातचे पदार्थ खायला अटलजींना अतिशय आवडत. अटलजी निरनिराळया खाद्यपदार्थांचे चाहते होते. पण तरीही आईच्या हाताची चव त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी होती. अटलजींचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरला झाले. ग्वाल्हेरच्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वाल्हेर  मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.याच सुमारास समर्पित संघ प्रचारक नारायणराव तरटे यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या प्रेरणेतून अटलजी संघकार्याशी जोडले गेले ते कायमचेच. नारायणराव तरटे हे अटलजींपेक्षा वयाने फार मोठे नव्हते. पण तरीही या दोघांचे गुरुशिष्याचे नाते अलौकिक असे होते. अटलजी त्यांना मामू म्हणत. याच नारायणरावांना अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील असा विश्वास होता. 

नारायणराव यांना अटलजी यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक पत्र पाठवले होते. अतिशय सुंदर अशा या पत्रात अटलजींनी आपले जीवन कसे असावे याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात ' बम्बई से प्रकाशित नवनीत ने दिवाली अंक के लिये पूछा था की मेरी मनोकामना क्या है ! पता नही आपके बौद्धिक वर्ग के भाव मुझे कैसे स्मरण आ  गये और मैने कह दिया : हसते हसते मरना और मरते मरते हसना यही मेरी मनोकामना है. '

य दरम्यान अटलजींवरील संघकार्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. ते एक उत्तम वक्ता आणि कवी म्हणून देखील नावारूपास येत होते.  याच कालावधीत त्यांनी लिहिलेली ' हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ' ही कविता सगळ्या संघ स्वयंसेवकांना इतकी स्फूर्तिदायक वाटली की ती सर्वत्र म्हटली जाऊ लागली. ते जिथे जात तिथे त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह होऊ लागला. बरेचदा अटलजी संघ कार्यासाठी कॉलेजचे तास बुडवून जात. हे जेव्हा त्यांच्या वडलांना कळे तेव्हा वडील रागावत. अटलजी त्यांना म्हणत तुम्ही माझे मार्क्स बघा, मग बोला. आणि खरंच अटलजी संघ कार्यासाठी वेळ देऊनही अभ्यासात कुठेही मागे पडत नसत. 

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव* 

 *०३/१२/२०२०* 

( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )
➖➖➖➖➖➖➖➖
*उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग दोन )* 

अटलजी ग्वाल्हेरच्या कॉलेजातून हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या तीनही विषयात विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. अशा हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना तेव्हा ग्वाल्हेर संस्थानची शिष्यवृत्ती मिळत असे. ती अटलजींना सुद्धा मिळाली. पण अशा विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर संस्थानात काही काळ नोकरी करावी लागे. पण अटलजी ज्या निष्ठेने संघाच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य करीत होते, ते पाहून त्यांच्यासाठी ही अट  शिथिल करण्यात आली. या पुढील शिक्षणासाठी अटलजींनी कानपूरला जाण्याचे ठरवले. कानपूरला जाऊन एकाच वेळी एम ए आणि एल एल बी करण्याचा त्यांचा मानस होता. 

पण यावेळी एक गमतीदार गोष्ट घडली. अटलजींच्या वडलांनी देखील त्यांच्या सोबत लॉ ला प्रवेश घेण्याचे ठरवले. एकाच वेळी वकिलीचे शिक्षण घेणारे हे बहुधा पहिलेच पिता पुत्र असावेत. ते एकत्र एकाच होस्टेलवर राहत आणि एकाच वर्गात बसत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष ही जोडी आकर्षून घेत असे. एम ए च्या परीक्षेत अटलजींनी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला. पण एक आश्चर्याची गोष्ट घडली. त्यांचे वडील वकिलीची परीक्षा पास झाले. अटलजी मात्र त्यात अयशस्वी झाले. त्याला कारणही तसेच होते. या काळात मुस्लिम लीगच्या ' डायरेक्ट ऍक्शन ' मुळे देशातील वातावरण गढूळ झाले होते. हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा धोक्यात आला होता. हिंदूंवर अत्याचार होत होता. देश फाळणीच्या उंबरठयावर उभा होता. 

अशा वेळी संघाचे जातीय सलोख्यासाठी प्रयत्न सुरु होते. हिंदू समाजाचे मनोधैर्य टिकून राहावे यासाठी संघ प्रयत्नशील होता. गोळवलकर गुरुजी सर्वांना सहकार्यच आवाहन करीत होते. अशा वेळी अटलजींसारखी देशभक्त व्यक्ती केवळ अभ्यासात रमणे शक्यच नव्हते. खरं तर त्यांना वकिलीसोबतच पी एच डी पण करायचं होतं. पण भारतमातेला जणू त्यांच्यासारख्या तरुणांची गरज होती. भारतमातेच्या सेवेप्रित्यर्थ लॉ आणि पी एच डी या आपल्या दोन्ही स्वप्नांवर अटलजींनी जाणीवपूर्वक पाणी सोडले आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. 

ते लखनौ जवळील संडीला गावी आले. इथे त्यांची प्रकृती बरी नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली. याच काळात त्यांची प्रसिद्ध कविता ' अमर आग है ' लिहिली गेली. या कवितेतून त्यांच्या भावनांना अटलजींनी वाट करून दिली आणि देशभक्तीची ही आग प्रत्येक हृदयात पेटवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. 

कोटि कोटि आकुल हृदयोमे 

सुलग रही है जो चिंगारी, 

अमर आग है, अमर आग है !

ही देशभक्तीची आग त्यांच्या हृदयात सतत धगधगत होती. याच कालावधीत ' राष्ट्रधर्म ' या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एका अगदी  खोलीत त्यांच्यासोबत अटलजी इतर काही संघ कार्यकर्त्यांसोबत राहू लागले. अटलजी खाण्याचे जरी शौकीन होते तरी याकाळात मिळेल ते जेवण स्वीकारून त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. यावेळी पाञ्चजन्य या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही त्यांच्यावर आली. संघकार्य करीत असताना अटलजींवर संघाच्या एकात्मभावाचा अतिशय चांगला परिणाम झाला. संघामध्ये जातपात, भेदभाव आदींना स्थान नव्हते. या सगळ्या गोष्टींनी प्रभावित होऊन अटलजींनी आपल्या गळ्यातील जानवे काढून टाकले. त्यांचे वडील त्यांना याबाबत बोलले, तरी त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून होते यावर अटलजींचा ठाम विश्वास होता. कोणतीही गोष्ट इतरांना सांगण्याआधी ते स्वतः ती आचरणात आणत असत. 

अटलजींच्या विचारात स्पष्टता असे. त्याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. देशातील मुस्लिम लीगने निर्माण केलेले वातावरण पाहून गोळवलकर गुरुजींनी देशातील मुस्लिमांसंदर्भात एक  विधान केले होते. त्यावेळी त्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी इंदिराजी उपस्थित होत्या. त्यांना गोळवलकर गुरुजींचे विधान अजिबात मान्य नव्हते. त्या अटलजींना म्हणाल्या, ' याचा अर्थ या देशात मुस्लिमांना स्थान नाही. ' अटलजी म्हणाले ' असे त्यांनी कुठे म्हटले आहे हे मला दाखवा. ' इंदिराजी म्हणाल्या की गोळवलकर गुरुजींच्या मते मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायला हवे. याचा अर्थ त्यांना या देशात स्थान नाही. अटलजींनी इंदिराजींना फार सुंदर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ' यात चूक ते काय राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे याचा अर्थ त्यांना या देशात स्थान नाही असा होत नाही. या देशाचे नागरिक म्हणून राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायलाच हवे. राष्ट्रीय प्रवाह ओळखता यायला हवा. त्याबाबतच मतभेद असतील तर मग बोलणेच व्यर्थ ! ' या अटलजींच्या तर्कशुद्ध उत्तरावर इंदिराजींना काही बोलता आले नाही. 

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव* 
 *६. १२/. २०२०* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा )*
➖➖➖➖➖➖➖➖
Vishwas Deshpande:
 *उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन )* 

राजकारणासारख्या रुक्ष वातावरणात राहूनही अटलजींनी आपली काव्यप्रतिभा कधी कोमेजू दिली नाही. त्यांच्यातला लेखक आणि कवी त्यांच्यातल्या राजकारणी व्यक्तीला सदैव मार्गदर्शन करीत राहिला. त्यामुळे इतर राजकारणी व्यक्तींप्रमाणे अटलजींनी बोलताना कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. देशभक्ती तर त्यांच्या नसानसात भिनली होती. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटकही झाली होती. पुढे ज्या संघाचं काम ते करीत होते, त्या संघावरही बंदी आली.  पण अटलजी विचलित झाले नाहीत. आपल्या ' कदम मिलाकर चलना ' होगा या कवितेत ते म्हणतात 
बाधाए आती हैं आए, 
घिरे प्रलय की घोर घटाए 
पावोंके नीचे अंगारे 
सिर पर बरसे यदी ज्वालाये, 
निज हाथोंसे हसते हसते,
आग लगाकर जलना होगा !
कदम मिलाकर चलना होगा !
हाच बाणा आणि हीच आग त्यांनी आयुष्यभर पेटती ठेवली. वेगळे वागणे त्यांना शक्यच नव्हते. याच सुमाराला अटलजी एक प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्धीस येत होते. आपल्या विदवत्तापूर्ण वक्तृत्वाने त्यांनी संघामध्ये एक वेगळी छाप पाडली होती. १९५७ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अटलजींसारख्या फर्ड्या वक्त्यावर संघाची मदार होती. त्यामुळे अटलजींना बलरामपूर, लखनौ आणि मथुरा या तीनही मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. घागरा नदीच्या काठी असलेले बलरामपूर हे नेपाळ यात्रेतील एक महत्वाचे ठिकाण होते. या ठिकाणी थांबून यात्रेकरू पुढे जात असत. अशा या बलरामपूरला जातीय वादाचे ग्रहण लागले होते. या ठिकाणी मुस्लिम धर्मीय जमीनदारांचे वर्चस्व होते. हे जमीनदार गोरगरीब हिंदू जनतेला भयंकर त्रास देत असत, पिळवणूक करीत असत. येथे त्यांची दहशत एवढी वाढली होती की हिंदूंना शंख, घंटा इ वाजविण्यासही बंदी होती. त्यामुळे या मुस्लिम जमीनदारांविरुद्ध जनतेत असंतोष होता. लखनौ आणि मथुरा येथील मतदारसंघात अटलजींचा पराभव झाला पण बलरामपूरमध्ये हिंदूंमधील असंतोषाचा फायदा त्यांना मिळाला आणि अटलजी १,१८,३६० मतांनी दणदणीत विजय मिळवून  निवडून आले आणि अशा रीतीने संसदेत त्यांचा प्रवेश झाला. 
यावेळी संसदेत गोविंद वल्लभ पंत, पं नेहरू, मौलाना आझाद, जगजीवन राम या सारखे दिग्गज आणि अनुभवी नेते निवडून आलेले होते. या तुलनेत अटलजी नवीन आणि अननुभवी होते. पण आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी या नेत्यांना देखील प्रभावित केले होते. त्यांचे प्रांजळ आणि परखड विचार, ओघवती आणि मंत्रमुग्ध करणारी अभ्यासपूर्ण भाषाशैली यामुळे त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. स्वतः पंडित नेहरूंनी अटलजींचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. 
यानंतर १९६२ च्या लोकसभा निवडूणुकीत मात्र अटलजी निवडून येऊ शकले नाहीत. स्वतंत्र भारताच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत महत्वाचा होता. या काळात चीनचे आक्रमण, लाल बहादूर यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याचे पंतप्रधान पदावर आरूढ होणे, ताशकंद कराराच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणे या सारख्या वेगवान घटना घडत होत्या. अशा वेळी अटलजींसारखी व्यक्ती संसदेत असणे ही काळाची गरज होती. पण निवडून न आल्याने त्यांना ही संधी मिळू शकली नाही. याची खंत त्यांच्या संवेदनशील मनाला कायम होती. याची उणीव त्यांनी पुढे भरून काढली. असे असले तरी १९६२ आणि १९६८ या दोन्ही वर्षी ते राज्यसभेत सदस्य म्हणून होतेच. 
अटलजींचं वक्तृत्व श्रोत्यांना खिळवून ठेवत असे. त्यामध्ये त्यांचा रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथांचा सखोल अभ्यास दिसून त्यात ते कोट्या इतक्या मार्मिक पद्धतीने करीत की समोरच्याची हसून हसून पुरेवाट होत असे. या जोडीला त्यांचे प्रभावी हातवारे यात भर घालत. मात्र श्रोत्यांना विनोदातून ते सहज गंभीर वस्तुस्थितीकडे घेऊन जात. जबाबदारीची जाणीव करून देत. विरोधी पक्षीयांच्या डोळ्यायेई. तुलसी रामायणाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भाषाशैली ओघवती असे. सभेच्या सुरुवातीपासूनच ते श्रोत्यांना खिळवून ठेवत. कोणाचेही नाव न घेता समोरचा जर चुकला असेल तर ते त्याच्या डोळयांत झणझणीत अंजन घालत आणि तेही कुठलीही मर्यादा न सोडता. त्यांच्या वक्तृत्वाचा एक किस्सा येथे सांगण्यासारखा आहे. 
१९७० च्या सुमारास पुण्यात त्यांची एक जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील सरकारचा एक गमतीदार किस्सा सांगितला. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. मध्य प्रदेशातील प्राथमिक वर्गात अंकलिपीचं एक पुस्तक लावलेलं होतं. त्या पुस्तकात ' ग ' गणपतीचा असं दिलेलं होता. तेव्हा काही सदस्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. कारण त्यांची तथाकथित धर्मनिरपेक्षता आड येत होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्यांनी ठरवलं की गणपती हटवून दुसरं काहीतरी त्या जागी टाकायचं. मंडळाचे सदस्य त्यासाठी शोध घेऊ लागले. त्यांना शोध घेता घेता एक प्राणी आढळला. तो म्हणजे गाढव. त्यांनी गणपती हटवला आणि गाढवाला त्या जागी विराजमान क

ेलं. वाजपेयींनी आपल्या मिश्किल शैलीत या घटनेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ' गणेशजी बुद्धी की देवता हैं और गधा मूर्खता का प्रतीक. लेकिन इनको गधा चलता हैं, गणेशजी नही. गणेशजीका  तिरस्कार और गधे का पुरस्कार...यही हैं इनकी सरकार. ' ( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* 
 *०९/१२/२०२०* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा )*
➖➖➖➖➖➖➖➖

*उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार )* 

अटलजींसारखा नेता म्हणजे भारतमातेला लाभलेलं दुर्मिळ रत्न..! राजकारणातल्या दलदलीत राहूनही हे कमळ फुलत राहिलं. त्यांचं सगळं जीवन म्हणजे कमलपत्रासारखं निर्लेप, निर्मोही. पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त, चिखल, दलदलीत राहूनही त्या सगळ्यांपासून अलिप्त. केवळ आनंद देणं हेच त्याचं काम. हे कमलपुष्प भारतमातेच्या चरणी जन्मापासूनच अर्पित झालं होतं, म्हणून तर अटलजी आजन्म अविवाहित राहिले. आपलं सगळं आयुष्य या महापुरुषाने भारतमातेच्या सेवेत व्यतीत केलं. 

अनेकांच्या जीवनात चढउतार येतात, अपयशाचे कडू घोटही घशाखाली रिचवावे लागतात. तसे अटलजींनीही रिचवले. अनेकदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणिबाणीसारख्या प्रसंगी कारागृहात राहावे लागले. या काळात तब्येतीच्या अनेक तक्रारींनाही तोंड द्यावे लागले.

 की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने 
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।

या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे हे सतीचे वाण त्यांनी हेतुपुरस्सर स्वीकारले होते,  त्यामुळे कधी पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. 

परिस्थितीच्या मागणीनुसार १९७७ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण जनता पक्षात करण्यात अटलजींचा पुढाकार होता. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झाले, त्यात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. या काळात त्यांनी या पदावर अतिशय प्रभावीपणे काम करून आपल्या नेतृत्वशैलीची वेगळी छाप उमटवली. परंतु ज्या पद्धतीने जनता पक्षाचे राजकारण आणि कामकाज सुरु होते, त्यावर अटलजी नाराज होते. त्यामुळे १९८० मध्ये त्यांनी जनता पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ते अध्यक्ष झाले. अटलजींनी फार थोड्या कालावधीत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवले. अर्थात त्यांच्या जोडीला लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, पं दिनदयाळजी उपाध्याय यांसारखे दिगग्ज नेते होते. पण अटलजींच्या नेतृत्वावर सर्वांचीच मदार होती. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पं दिनदयाळजी उपाध्याय यांच्यानंतर त्यांची पोकळी भरून काढणारा एकमेव ध्येयवादी, समर्पित नेता म्हणजे अटलजी. 

अटलजी एकंदर तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. मात्र त्यांचा सुरुवातीचा म्हणजे पहिल्या पंतप्रधानपदाचा काळ अल्पजीवी ठरला. त्यांनी सरकार चालवण्यासाठी किंवा सत्तेला चिकटून राहण्यासाठी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत. हे सरकार त्यामुळे फक्त तेरा दिवस चालले. पुन्हा दुसऱ्या वेळी अटलजी १९९८ मध्ये पंतप्रधान झाले. हे सरकार तेरा महिने पदावर होते. पण नियतीने पुन्हा तेरा ऑक्टोबर १९९९ मध्ये अटलजींना पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. यावेळी मात्र त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केला. पंतप्रधान म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे त्यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच बिगर काँग्रेसी सरकार होते. या काळात अटल सरकारने अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांचा उल्लेख पुढे येईलच. पण त्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना, परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना घेतलेले निर्णय त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतात. त्यातील एकदोन गोष्टी पाहणे महत्वाचे आणि रंजक ठरेल. 

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी श्रीलंकेत मदतीसाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हे जेव्हा अटलजींना कळले, तेव्हा ते विचारात पडले. ते उद्गारले, ' प्रभू रामचंद्रानंतर श्रीलंकेत सेना पाठवणारे राजीवजीच निघाले. पण हे त्यांचं धोरण मला दूरदर्शीपणाचं वाटत नाही. ' अटलजींचे उदगार सार्थ होते हे नंतर सिद्ध झालं. भारत श्रीलंका संबंध सुधारले तर नाहीतच, पण या निर्णयापोटी राजीव गांधींना आपल्या प्राणांचं मोल चुकतं करावं लागलं. पण राजीव गांधींच्या अकाली निधनाने कवीमनाचा हा नेता हळहळला. ते म्हणाले,

 ' जन्म के साथ मरण जुडा है. लेकिन जब मृत्यू सहज नही होती... भरी जवानी में किसी जीवनपुष्प को चिता के राख मे बदल देती है... एक षडयंत्र का परिणाम होती है, तो परिवारवाले किस तरह से उस वज्रपात को सहें  ?'

नरसिंहराव पंतप्रधान असतानाची एक घटना आहे. काँग्रेसच्या काही खासदारांनी काँग्रेसच्याच चार मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तसे पत्र नरसिंहरावांना पाठवून पक्षाला घरचा आहेर दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांना सरकारला कोंडीत पकडण्याची ही नामी संधी आहे असे वाटले आणि ते अटलजींकडे आले. अटलजींना ही बातमी सांगून त्यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा अशी विनंती केली. पण अटलजींनी त्याला नकार दिला. ते खासदार आश्चर्यचकित झाले. अटलजी असे का म्हणत आहेत हे त्यांना कळेना. संसदेतील शून्य प्रहराला अजून काही अवधी बाकी होता.

अटलजी त्या खासदारांना म्हणाले, ' ज्यांनी त्या मंत्र्यांवर आरोप केले, त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला भेटतो का ते पहा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकडून त्या पत्राची प्रत मिळवा. ' परंतु त्या खासदारांना ना ते आरोप करणारे खासदार भेटले ना त्या पत्राची प्रत मिळू शकली. एखादी बातमी केवळ वृत्तपत्रात आली म्हणून ती खरी मानून चालणाऱ्यांपैकी अटलजी नव्हते. म्हणूनच त्यांच्या शब्दाला  विश्वासार्हता आणि वजन प्राप्त झाले होते. 

 *© विश्वास देशपांडे, चाळीसगाव* 
 *११-१२-२०२०* 
 *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )
➖➖➖➖➖➖➖➖
*उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग पाच - अंतिम )* 

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत - पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता.
अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

 *गुंजी हिंदी विश्वमें* 
 *स्वप्न हुआ साकार* 
 *राष्ट्रसंघ के मंचसे* 
 *हिंदी की जयकार* !

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला. 

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा.ए.सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली.  100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.
देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली.आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली. 

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस...राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 *जन्म मरण का अविरत फेरा* 
 *जीवन बंजारो का डेरा* 
 *आज  यहाँ कल कहाँ कुच है* 
 *कौन जानता किधर सवेरा...* 

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

 *हम पडाव को समझे मंझिल* 
 *लक्ष्य हुआ आँखो से ओझल* 
 *वर्तमान के  मोहजाल मे* 
 *आनेवाला कल न भुलाए* 
 *आओ फिरसे दिया जलाएँ* ...

आपल्या वाणीनं  सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी  तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला,  निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची.  ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली. 

 *दांव पर सब कुछ लगा है* 
 *रुक नही सकते, टूट  सकते है* 
 *मगर हम  झुक नही सकते*... 

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना  म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल.’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’  देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले.

 *अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे.*

 हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे. २५ डिसेंबर हा *अटलजींचा जन्मदिवस गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.* आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा. 

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* 
 *१३-१२-२०२०* 
 *प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment