मी उदगीरकर , उदगीरकर असल्याचा सार्थ अभिमान. बालपणातील उदगीर च्या आठवणीमी
*दोस्तांनो आपला गावच बरा*
किल्ला वेस ओलांडून पुढे गेल्यावर शारवाल्याचं जाळीच्या खिडकीतून डोकावून सामान देणार दुकान, शेटकारच घर ओलांडून पुढे मार्गस्थ झालो की नजरेत भरणारा भुईकोट किल्ला म्हणजे जिवंत इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेला उदगीरचा भक्कम आधार.. किल्ल्यात प्रवेश करुन उदागीर बाबांचं दर्शन घेऊन एक फेरफटका मारत बाहेर पडलो की १७६० मध्ये सदाशिवरावानी निजामाला दिलेली शिकस्त आठवून मान ताठ होऊन जाते.. परत किल्ला वेस ओलांडून पुढे दिसणारा अष्टकोनी चौबारा.. उजव्या बाजूला ढेप्याचं किराणा दुकान आणि डाव्या बाजूला रंगवाळचं औषधी दुकान.. रंगवाळच दुकान निडेबन रोडने पुढे मार्गस्थ झालो की उजव्या हाताला गल्लीत हावगीस्वामी महाराज मठ.. सरळ पुढे गेल्यास अगी बसण्णा... जानेवारी महिना जत्रा भरली की दिवसभर तिकडे धुळीत भटकत उंडे खाण्यासाठी घरी किराणा आणतांना वेगळे काढलेल्या ५ पैसे १० पैसे चाराणे अशी नाणी उपयोगी पडायची.. शंकर ढेप्याच्या दुकानासमोरुन पुढे मार्गस्थ झालो की डाव्या हाताला शंकरेप्पा महाराज मठ... मग सराफ लाईनचे दिवसभर तुडुंब गर्दी असलेले व रात्री आमची वाट पहात असणारे कट्टे.. चिल्लरगे गल्लीतून येताजाता केव्हातरी आमाटे असे ओरडत धूम ठोकण्याचा आनंद काही औरच होता..
आर्य समाज उदगीर मध्ये जवळून पाहता आला.. हनुमान कट्टा, लक्ष्मी नारायण मंदिर, साईबाबा मंदिर, बोधनची आई, रोकडे हनुमान,जुने बालाजी मंदिर आणि शहरालगत असलेल्या सोमनाथपूर मधील सोमनाथ मंदिर, भवानी माता मंदिर, कुंड हे सगळे वैभव आपल्या उदगीरचे..
बंगाली कोणी पाहीला नाही पण त्याची चर्चा आणि भय सगळ्यांना होते.. मखमल बावडी, पेठ वेशीच्या बाहेरील विहीर, किल्ल्यातील विहीर, घोडदरा हे मनसोक्त अनुभवलेले ऐश्वर्य.. अंजय्याच्या पेढीवर होणाऱ्या गर्दीची चर्चा, उषा टाॅकीज बांधकाम सुरू असताना मारलेल्या चकरा आणि पहीला पिक्चर जय संतोषी माॅं पाहील्याच आवर्जून सांगतात ते उदगीरकर.. फडकर लाईनला जाऊन निकृष्ट दर्जाचे सामान आणून सुध्दा खूप चांगले आहे हे सांगायला न विसरणारे आपण.. उदय टाॅकीज, उषा टाॅकीज च्या दरवाज्याच्या फटीतून चोरुन पिक्चर बघायला मिळणार याचा आनंद.. इंटरव्हल मधला पास घेऊन निघून जायचे आणि दुसऱ्या दिवशी येणारा नवीन पिक्चर इंटरव्हल नंतर तो पास वापरून बघण्याचा आनंद.. आहाहा... नवीन पिक्चर येणार म्हणून आगामी आकर्षण असं लिहून लावलेल्या काचेतील प्रिंट तासनतास बघत बसण्याची झुंबड.. आनंदभुवनचा कच्चा चिवडा, अजिंठा मधील गुलाबजाम, लकी मधील काॅफी, राजेश्वरी हाॅटेलमधील थाटमाट, काॅर्नर ची केटी,पस्तापुरेच्या हाॅटेलमधली पुरी भाजी, अंजय्याच्या शेजारी दाळवं विकणारी म्हातारी, छछैंछैंछैं म्हणत चिवडा विकणारा मठातील माणूस, तोडमोडीवर बर्फी विकणारा काळा माणूस,चौबाऱ्याला सेकड्याच्या मापाने आंबे विकणारे डाल घेऊन बसणारे शेतकरी हे वैभव अनुभवणारे आपण उदगीरकर.. डॉ. मुंगीकर, मध्वरे, घनपाठी, लोहारकर,कोटलवार, वैद्य हे तत्कालीन जिवनदाते.. रिगल टेलर,जुगनू टेलर, हाशमी टेलर, बाॅबी टेलर हे मान्यवर कपडे शिवून देणारे व्यक्तिमत्त्व... त्यात जुगनू टेलरच्या मालकाचे बेल बाॅटम आणि दुकानात असलेली घार, लैला मजनू मधील ऋषी कपूर सारखी वेशभूषा करून थाटात वावरणारा बाॅबी टेलर.. बारीक आवाजात बोलत साड्या रंगवून देणारा व्यावसायिक..
चौबारा ते पेठ वेस .. तळवेस.. निडेबन वेस... पोलिस ठाण्याच्या अलिकडील वेस.. या मुळ उदगीरचे रहिवासी आणि देगलूर रोड,नयी आबादी,बिदर रोड, शाहू काॅलनी, नांदेड रोड या भागातील रहिवासी यांच्यात बराच फरक होता.. नयी आबादी भागातील रहिवासी उच्चभ्रू वर्गातील आहेत असे समजले जायचे.. पण जे जुन्या उदगीरला उदगीर कळले ते आजही बाहेर राहणाऱ्या लोकांना समजले नाही..
भगवान सिंह गुरुजींचं इंग्रजी जेवढं भिंतीला कळले तेवढं आम्हाला अजूनही स्पष्ट झाले नाही.. पटणे सरांनी सतत काॅलर धरुन शिकवलेल्या गणीताची सर साखरे सरांच्या ट्यूशन मध्ये आली नाही कधीच... आपल्याकडे संग्राम शाळेचे तज्ञ, श्यामलालचे आर्य समाजी, विद्यावर्धिनीचे पाटलं आणि लाल बहादूरचे चाकोरीबद्ध सोवळ्या आविर्भावात जगणारे सर्वमान्य उदगीरकर भरपूर आहेत.. शिवाजी काॅलेजमधून राजकारण शिकलेले, उदयगिरी मधून उच्च शिक्षण घेऊन पुढे नामवंत झालेले, हावगीस्वामी मधून बाहेर पडून वाणिज्य तज्ञ म्हणून नावारूपाला आलेले आणि श्यामलाल चा टेंभा मिरवत जगणारे भरपूर मान्यवर आहेत..
पण मित्रांनो त्या वेळी जे शैक्षणिक कौशल्य उदगीर मध्ये होते ते महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण होते.. विलासराव बाभळगाव ऐवजी उदगीर तालुक्यातील असते तर उदगीर जिल्ह्यातील लातूर हा एक तालुका म्हणून ओळखला गेला असता.. रेल्वे स्टेशन,बसस्टॅन्ड हे फिरायला जायचे महत्वपूर्ण ठिकाण होते.. अखिल भारतीय पशु प्रदर्शन हे पशुंसाठी नव्हतेच मुळी, ते दैनंदिन उत्सवाचं ठिकाण होतं.. काॅलेजमध्ये दांडी मारायची अन् पशुप्रदर्शन स्थळी घाणेरड्या वासाचा आस्वाद घेत उत्साहात भटकत रहायचे.. प्रगती टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन टायपिंग शिकणारी मंडळी साधारण समजले जायचे..
पाडव्याला किल्ल्यात, श्रावणी सोमवार सोमनाथपूरात, नवरात्र सोमनाथपूर आणि बोधनच्या आईला असे अगदी वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जपणारी माणसे उदगीरची.. आंध्र कर्नाटक मधून रेल्वेने आलेल्या तांदूळाची वाहतूक आणि त्यांना पकडून मांडवली करणारे रक्षक मन लावून पहात होतो तेव्हा.. उधारी खात्यावर चालणारे सगळे व्यवहार.. अगदी सराफ ते चर्मकार बांधवापर्यंत... किरकोळ खरेदी करताना अंगावर खेकसणारे नामवंत सावकार... आहाहा सगळं लय भारी... (क्रमशः)
.... उदगीरचा मी
No comments:
Post a Comment