Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, February 2, 2023

वाढदिवसाच्या निमित्ताने लिहलेला लेख - अनंत चंपाई माधव कदम संयोजक:- चला कवितेच्या बनत, उदगीर.

*ज्ञानदान करणारे ज्ञानेश्वर बडगे*
      शिक्षण हा जीवन यशस्वी जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शिक्षणाशिवाय जगणे म्हणजे आंधळ्या पांगळ्याचे जगणे म्हणावे लागेल. शिक्षण मानवाचा खरा व तिसरा डोळा आहे असे म्हणतात ते काही खोटं नाही. शिक्षण माणसाला जगण्याचा अर्थ सांगून त्या मानवाचे जगणे सार्थ बनवते, म्हणूनच तर आजच्या विज्ञान युगात, नवतंत्रज्ञानाच्या  साह्याने जगणे सुखकारक बनवले जात आहे. विज्ञानाणे मानवाला खाण्यापिण्या सोबतच वागणे, बोलणे आणि भौतिक सुख सुविधांची उपलब्धता, त्यांचा उपयोग करणे आणि उपभोग घेणे , यासंबंधी प्रकृती आणि प्रवृत्तीला साजेशी जीवन नियमांची जाणीव करून दिली आहे. अशा परिस्थितीत शिक्षण नसेल तर हे सर्व व्यर्थ ठरणारेच म्हणावे लागेल. 
          आज प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व कळालेले असून आपल्या पाल्यांना योग्य आणि उच्च शिक्षित बनवण्यावर प्रत्येक पालक भर देत आहेत. आपले जीवन भलेही निरक्षरतेच्या अंधाराने काळवंटलेले असले तरी आपल्या भावी पिढीला सुशिक्षित बनवून साक्षरतेच्या प्रकाशात विज्ञानाच्या आधारे जीवन सुखकर बनवण्यावर प्रत्येक पालकांचा भर आहे. काळाच्या ओघात सारेच काही बदलत जाते असे म्हणतात. अगोदरच्या मानवी राहणीमानातील आणि आजच्या मानवी राहणीमानातील फरकाचा विचार केला तर आता त्यात खूपच मोठा बदल झाल्याचे जाणवते. याचे खरं कारण आहे ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाला विज्ञानाची जोड लाभली अन दुधात साखर पडली. आज माणूस सुशिक्षित होत असून विज्ञान व तंत्रज्ञानाला समजून घेऊन त्या आधारे आपले जीवन सुधारत आहे. 
            शिक्षण हे घेणारा आणि देणारा या दोघांवर अवलंबून आहे. अगोदरच्या काळात ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांना शिक्षण दिले. नंतर गुरुकुल पद्धती आली आणि आज शाळा महाविद्यालय देखील हेच काम करत आहेत. शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर. येथे गुरु शिष्यांचे अतूट नाते निर्माण होते. या माध्यमातून गुरु आपल्या शिष्यांना योग्य ते शिक्षण देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करतात. गुरु शिष्याचे नाते म्हणजे माता पिता व पुत्राच्या ही पलीकडचे नाते मानले जाते. हेच नाते जपत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे अनेक शिक्षक वृंद आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. आपण स्वीकारलेली जबाबदारी इमाने इतबारे शिकवणारे जरी मोजकेच आहेत असे वाटत असले तरी त्यांची यादी केली तर खूप मोठी होईल. अशा या शिक्षकांच्या संदर्भाने विचार करत असताना एक नाव आवर्जून घ्यावे असे वाटते ते म्हणजे आदरणीय ज्ञानेश्वर बडगे यांचे नाव. 
            प्रतिकूल परिस्थितीत सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले ज्ञानेश्वर बडगे यांचे वडील भाऊराव बडगे यांनी भजन आणि गोंधळाच्या माध्यमातून आपला उदाहरण उदरनिर्वाह चालवत असतानाच शिक्षणाला महत्त्व देत आपल्या पाल्यांना योग्य त्या संस्कारासह शिक्षण देऊन सक्षम बनवले. यामुळेच ज्ञानेश्वर बडगे हे शिक्षक बनू शकले. ज्ञानेश्वर बडगे यांनी आपल्या परिवाराची पूर्व परिस्थितीची जाणीव ठेवून आपले शैक्षणिक कार्य चालू ठेवलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊनही शिक्षक या पदापर्यंत मजल मारली आहे. आजच्या काळातील विद्यार्थी म्हणजे उद्याच्या भविष्याचे नागरिक. नागरिक हे जर सुशिक्षित झाले तरच उद्या यांच्या हातून काहीतरी चांगले घडू शकते. यासाठी योग्य शिक्षण देण्यात ज्ञानेश्वर बडगे यांनी आपल्या पूर्वपरिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याला आलेल्या अडचणी, त्यातून केलेला प्रवास , या सर्व बाबींचा अनुभव ध्यानात घेऊन आपल्या समोरच्या ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या घरातील कष्टी शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम चालू ठेवलेले आहेत. आपल्यासमोर व सहवासात येणारा कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याच भावनेने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या शिक्षकी पेशाशी प्रामाणिक राहून सर्व विद्यार्थ्यांना सर्वांग सुंदर सक्षम बनवण्यासाठी शाळेच्या सर्व भिंती बोलक्या करून संपूर्ण वर्ग सजावट करणे असो की अभ्यासक्रमाच्याही पलीकडे जाऊन अत्यंत सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य बडगे गुरुजी करत आहेत. 
                    नितीमूल्यांचे शिक्षण काळाची गरज समजून नैतिकतेची जाणीव आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करून देत, परिपूर्ण आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी गुरुजींनी नवोदय शिष्यवृत्ती सारख्या विविध बौद्धिक परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले. त्यासाठी वेगळे तास घेऊन योग्य मार्गदर्शन ते करीत आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे बरेच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. ज्ञानाचा साठा वाढवण्यासाठी अवांतर वाचनाची गरज लक्षात घेऊन अवांतर ज्ञानाचा साठा वाढवण्यासाठी चावडी वाचन, निसर्ग शाळेबरोबरच वेगवेगळ्या ज्ञानवर्धक पुस्तकांची उपलब्धता करून देत त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचे कार्य ज्ञानेश्वर बडगे गुरुजी करीत आहेत.  विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळाला पाहिजे या हेतूने विविध धार्मिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन ही बडगे गुरुजी सातत्याने करत असतात. त्यांच्या जोडीलाच वक्तृत्व गुण वाढीस लागला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना बोलके करणे त्यांना वादविवाद स्पर्धेत सहभागी करणे,  वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करणे यासाठी ते सातत्याने अशा स्पर्धांचे आयोजन करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुठलातरी एखादा कला गुण दडलेला असतोच. त्याला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी नृत्य,गायन,  वादन, आशा विविध क्रीडांचे देखील बडगे गुरुजी सातत्याने आयोजन करत आलेले आहेत व आजही ते करत आहेतच. ज्ञानेश्वर बडगे गुरुजी उच्चशिक्षित शिक्षक म्हणून सेवेला लागले. ते ज्या ज्या शाळेत गेले त्या त्या शाळेवर अनेक विविध उपक्रम राबवीत राहिले. या कामी प्रसंगी आपल्या खिशाला चाट बसला तरीच मागचा पुढचा कसलाही विचार न करता ते सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमशीलतेमुळेच ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचा शांत संयमी विचार प्रत्येक पालकाबरोबरच स्नेहपूर्ण संबंध यामुळे पालक देखील बडगे गुरुजी बद्दल आशावादी आहेत. 
                      त्यांच्या उपक्रमशील अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे शासनाचा त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला असून महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक,नवी दिल्ली.  महाराष्ट्र गौरव राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार,  राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, याशिवाय नाशिक येथील राष्ट्रीय समता फेलोशिप  औरंगाबादचा राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार ,असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार गुरुजींना मिळालेले असून स्थानिक परिसरातील अनेक महत्त्वपूर्ण पुरस्काराने ज्ञानेश्वर बडगे सन्मानित  व आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. यापैकी परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, नळदुर्ग, सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, मानव विकास सेवा राज्यस्तरीय पुरस्कार, संत गाडगेबाबा आदर्श शिक्षक पुरस्कार असे एक दोन नाहीतर तीस पेक्षा जास्त पुरस्काराने बडगे गुरुजी सन्मानित आहेत . 
             सहशिक्षक या पदावरून सेवेला सुरुवात केलेले ज्ञानेश्वर बडगे हे आज मान्यताप्राप्त मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर आपल्या शिक्षणाची सुरुवात केलेली ज्ञानेश्वर बडगे हे आज मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळत असले तरी आपल्यातला( गुरु) शिक्षक जिवंत ठेवून ते कार्यरत आहेत. त्यांच्यातील उपक्रमशीलता, विद्यार्थ्यांप्रती असलेली प्रेमळ भावना, पालकां सोबत जोडले गेलेले स्नेहांचे नाते व त्यांची कार्यपद्धती यामुळे ते प्रत्येकालाच हवेहवेसे वाटणारे, आपलेपणा जोपासणारे, सदा निष्ठेने कार्य करणारे, लीनतेने वागणारे ज्ञानेश्वर गुरुजी यांचा 6 फेब्रुवारी हा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दलचा स्नेहभाव मला हा शब्द प्रपंच मांडावयास भाग पाडला आहे. आजच्या या शुभ दिनी ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल की, बडगे गुरुजींच्या ज्ञानदानाच्या कार्यात सदा यशाचा प्रकाश पाडावा व त्यांच्या हातून चालू असलेला हा ज्ञानदानाचा महायज्ञ असाच सतत घडत रहावा याच शुभेच्छा.
            --    चमक 
      अनंत चंपाई माधव कदम 
संयोजक:- चला कवितेच्या बनत, उदगीर.

No comments:

Post a Comment