Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, July 10, 2022

आषाढी एकादशी निमित्ताने लिहलेला लेख





*सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलींच्या दर्शनाचा*
--------------------------

सर्व वारकरी व माऊली च्या भक्तांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलींच्या दर्शनाचा माऊली माऊली जय हरी विठ्ठल तमाम वारकऱ्यांचे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग आणि पांडुरंगाचा अथांग सोहळा आषाढी वारी.माझें माहेर पंढरी आहे भिवेरेच्या तिरीं. बाप आणि आई. माझी विठ्ठल रूखूमाई..वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. यावर्षी 10 जुलै 2022 रोजी रविवारी आषाढी एकादशी येत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे वारकऱ्यांचा हिरमोडही झाला होता. यंदा मात्र पायी दिंडीला परवानगी देण्यात आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. गेल्या आठशे वर्षांपासून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या वारी  घेऊन पंढरपूरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैल पायी चालत येतात. यात आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची, देहू येथून संत तुकारामांची, त्रंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होते. या आषाढी एकादशी ला वारकरी संप्रदाय टाळ, मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकरी पंढरपूरकडे जातानाचे दृष्य डोळ्यासमोर येते. विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात. आषाढी एकादशी वारी सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’ अश्व मिरवणूक. लाखोंच्या संख्येने वारकरी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील होतात , तर महिला भगिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तीमय होऊन सहभागी होतात. या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याला खूप महत्त्व असते. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. आषाढीच्या एकादशीचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या वारीला जाण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि ते वारी करून घरी परत जाईपर्यंत शेतातील पिके वाढत असते. हे पाहून सर्व शेतकऱ्यांना सूख समाधान मिळते. अशा प्रकारे अतिशय आनंददायी भक्तीमय वातावरणात माऊली माऊली च्या जय घोषात, विठ्ठलाचा जयघोष करीत अन् अभंग सादर करीत आषाढी एकादशी साजरी करतात.
-----------------------------
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
-----------------------------




No comments:

Post a Comment