Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, April 11, 2023

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🌹🌹🙏🙏* 
➖➖➖➖➖➖➖➖➖
समरसतेच्या मार्गाने बलशाली भारताचं स्वप्न सत्यात उतरवणारे ' क्रांतिसूर्य महात्मा फुले'

समरसतेच्या मार्गाने बलशाली भारताचं स्वप्न सत्यात उतरवणारे ' क्रांतिसूर्य महात्मा फुले'
एप्रिल १२, २०२१
समरसतेच्या मार्गाने बलशाली भारताचं स्वप्न सत्यात उतरवणारे ' क्रांतिसूर्य महात्मा फुले'

प्रात: समयी धरित्रीच्या पोटातून जन्म पावणाऱ्या 'सूर्यज्योती' प्रमाणे सन १८२७ च्या एका सकाळी भारतमाता चिमणाबाईच्या पोटी एक कोमल ‘दिव्यज्योती' आमच्या हिंद भूमीवर उदय पावली आणि बारावा दिवस उजाडल्यावर त्या दिवशी चिमणामातेनेही आपल्या बालकास - दीनांच्या या ज्योतीस - पाळण्यात घालून त्याचे ‘ज्योतिराव' हेच सार्थ नाव ठेविले.

बालज्योतीचे वडील गोविंदराव फुले हे पुणे शहरांतील माळी समाजाचे एक प्रमुख मेहेत्रे होते. त्यांनी एका दाईकडून ज्योतिबांची जोपासना केली व हिंडुफिरू लागल्यावर वयाच्या सातव्या वर्षी शिकणे हे पाप अशी लोकांची समज असल्यामुळे इंग्रजी राज्यात हे पाप पहिल्याने गोविंदरावांच्या हातूनच घडले. ज्योतिरावला विद्येची स्वाभाविकच गोडी लागली व तो झपाट्याने शिकू लागला.  देशभक्तीचे वारे शिरून इंग्रजी राज्य पालथे घालण्याकरिता ते लष्करी शिक्षण घेऊ लागले व या विद्यार्थीगणात ज्योतिबांनी थोडया दिवसांत प्रमुख स्थान पटकाविले. त्यावेळी पुण्यात 'लहुजी साळवे' या नांवाचे तालिमबाज नामांकित व तरबेज होते. त्याचे जवळ ही मंडळी दांडपट्टा, ढाल-तलवार, गोळीबार व कसरत वगैरे कामे शिकली.

ज्योतिबा सतरा वर्षे वयाचा असेल. एके दिवशी सकाळी तो आपल्या मळ्यातून घरी जात असता त्याला रस्त्यावर दोन गोरे सोजीर भेटले व एका कुरापतीवरून त्याचे सोजीरांशी भांडण पेटले. प्रकरण धक्काधक्कीवर गेले, तेव्हा ज्योतिबाने आपल्या जवळच्या उसाच्या पेडकीतील एका मजबूत टेरीने त्या सोजीरांच्या पाठी व डोकी चांगली नरम करून आपल्या रस्त्याने त्यांना पिटाळून लावले. ज्योतिबा व त्याचे मित्र हे रोज दिवसभर इंग्रजी शाळेत जाऊन पढाईचे आणि सांज सकाळ तालीमखान्यांत जाऊन लढाईचे असे दुहेरी शिक्षण घेत होते. हा त्यांचा क्रम नेहमी अखंडपणे चालू होता.

इतक्या अवधीत ज्योतिरावांनी मराठी भाषेचे पूर्णज्ञान संपादन करून इंग्रजी सात पुस्तकापर्यंत अभ्यास पुरा केला व वयाच्या २० व्या वर्षी शाळा सोडून ते सामाजिक कार्यकर्ते बनले. इंग्रजीत लिहिलेले निरनिराळे ग्रंथ व इतिहास वाचण्याचा त्यांना मोठा नाद लागल्यामुळे पुढे त्यांचे इंग्रजी पुष्कळ वाढले. ते आजन्म विद्यार्थीच होते.

एके दिवशीं त्यांच्या एका ब्राह्मण मित्राने त्यांना आपल्या लग्नास येण्याबद्दल आमंत्रण दिले व त्याप्रमाणे ज्योतिराव हे मोठ्या प्रेमाने त्या मित्राच्या लग्नप्रसंगास गेले. नवरदेवाची गांवात मिरवणूक निघाली असता तेही इतर मंडळीबरोबर दोस्ताच्या जवळ मिरवणुकींतून चालले होते. इतक्यात त्यांना एका कडव्या सनातनी व्यक्तीने पुढे येऊन मोठ्या शब्दांत दरडावून सांगितले की, “अरे ए पोरा खबरदार आम्हा बरोबर चलशील तर! तू जातीने शूद्र असताही आमच्या  मंडळीबरोबर चालतोस! तुझ्या स्पर्शाने आम्हाला विटाळ होत नाही काय? तू आमचे मागून चल!" अशी धमकी दिल्यावर ज्योतिराव घडीभर आश्चर्यमूढ होऊन जरा गोंधळल्यासारखे झाले. ज्योतिरावांचा संताप भयंकर वाढला. ते म्हणाले “काय मी यांच्याशी नमून वागावे? आणि ते का? या सनातन्यांनी सर्व लोकांना इतके छळले तरी ते आमचे देव! कोठला न्याय हा? कोणते हे शास्र? आणि कोठला हा धर्म?” असे पुटपुटून ज्योतिराव गप्प बसले. याचवेळीं ज्योतिरावांच्या विचारसरणीत एकदम फरक पडला! आपला हा झालेला मानसिक अपमान त्यांच्याने सहन झाला नाही त्यामुळे ज्योतिरावास त्या रात्री झोप कशी ती आली नाही. 

आपले समाधान व्हावे म्हणून ज्योतिरावांनी पुढे काही दिवस हिंदु धर्मातील बऱ्याच धर्म ग्रंथांचे वाचन केले. याशिवाय संत शिरोमणी, श्री तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादि भागवत धर्मीय ग्रंथ, मार्टीन लूथरचे चरित्र इ. हिंदू धर्मावर इंग्रजीत लिहिलेली पुस्तके व लेख वाचले. याशिवाय म. बुद्ध, बसवेश्वर, तिर्थंकर इत्यादि धर्मसुधारकांच्या ग्रंथाचाहि त्यांनी थोडा अभ्यास केला, तेव्हा ज्योतिरावांच्या लक्षात आले की आज ज्याप्रमाणे हिंदू धर्मात अन्याय व अनीती माजली आहे आणि आज जसे हिंदु धर्माचे विकृत स्परूप नजरेस पडते तसे ते पूर्वी नव्हते. मूळचा हिंदू धर्म शुद्ध स्वरुपाचा होता आणि त्याचप्रमाणे त्यांना हिंदु धर्मातील खुळचट चालीरितींची व अंधरुढीची बरीच कल्पना झाली. त्यांना पक्के कळून चुकले की, सर्व मानव प्राणी एका ईश्वराची लेकरे असून, तो सर्वावरच सारखे प्रेम करतो.  आपआपसांत जातीभेद माजवून उच्च निचत्वाच्या जोरावर सनातन्यांनी केवळ सोवळ्या ओवळ्याचे बंड माजविले व कपटाच्या जोरावरच ते इतरांचे देव बनले आहे. त्यामुळे समाज जागृत करण्यासाठी प्रथम शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेण्याचे ज्योतिरावांनी ठरविले. हे कार्य कसे तडीस न्यावे याचा साधक बाधक विचार करता, त्यांना वाटले की, पहिल्याने स्री वर्गातच शिक्षण प्रसार करावा. कारण पूर्वकाळी कौशल्या, देवकी, कुंती, पार्वती, सीता, द्रौपदी इत्यादि राष्ट्रमाता सुशिक्षित व सुसंस्कृत होत्या म्हणूनच त्यांच्या पोटीं महापुरुष निर्माण झाले आणि अलीकडच्या काळात देखील श्री शिवाजी, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापार्ट इत्यादि जगविख्यात पुरुषांच्या आया सुशिक्षित होत्या म्हणूनच ते इतक्या योग्यतेस चढले. प्रत्येक आईची योग्यता फार मोठी आहे प्रत्येक राष्ट्रपुरुष प्रथम आईच्या तालमीत तयार होतो. त्यांतून चांगल्या आईच्या पोटची मुले चांगली व्हायचीच.

॥ जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उद्धारी ॥

या उक्तिस अनुसरून राष्ट्रातील भावी माताच पहिल्याने सुशिक्षित झाल्या पाहिजेत अशी त्यांची ठाम समजूत होऊन प्रथम स्री वर्गात शिक्षण प्रसार करावयाचा असा त्यांनी निश्चय केला. पण कोणतीही सुधारणा लोकांपुढे मांडण्यापूर्वी ती प्रथम आपल्या कृतीत उतरून घेणे ज्योतिरावांना अगत्य वाटले व मुलींची शाळा उघडण्यापूर्वी त्यानी आपल्या धर्मपत्नीस लिहिणे वाचणे शिकवावयास सुरवात केली.

वैदिक कालानंतर स्री शिक्षणाची शाळा कोणी काढली होती हे आमचा इतिहास देखिल सांगत नाही. वैदिक काळी स्रियाना शिक्षण घेण्याची मुभा होती, परंतु मानवी हक्काचा पुरस्कार करून आधुनिक काळांत त्यांच्या शिक्षणाची पहिल्याने जर कोणी काळजी घेतली असेल तर ती ज्योतिरावांनी होय. आधुनिक काळी हिंदुस्थानात ज्योतिराव फुले यांनीच पहिल्याने मुलींची खाजगी शाळा काढून स्री शिक्षणास प्रथम चलन दिले !! बरोबर १८४८ सालच्या आरंभीची गोष्ट, ज्योतिरावांनी पुण्यास बुधवार पेठेतील भिडयांच्या वाडयात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी या कामी त्यांना रा. जगन्नाथ सदाशिवजी या सद्गृहस्थाने बरीच मदत केली. अस्पृश्यांच्या शिक्षण प्रसारास प्राधान्य देऊन त्या गोष्टीकडे लक्ष पुरवायचे असे त्यांनी ठरविले व त्या दिशेने प्रयत्न करावयास त्यांनी सुरुवात केली. 

आपल्या देशातील सहा, सात करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षापासून आपली माणुसकी गमावून बसले असून, ते धार्मिक गुलामगिरीच्या घोर नरकात पडले आहेत आणि त्यामुळेच हिंदुराष्ट्र लुळे बनले असून याचा सारखा ऱ्हास होत आहे, ही गोष्ट ज्योतिरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली. या वर्गात विद्येचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची अस्पृश्यता दूर होणार नाही; आणि विद्येखेरीज ते आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत, असे त्यांना नेहमी वाटत असे. एरव्ही हिंदुस्थानात व हिंदुधर्मात असलेले अनेक पंथ, जाती व उच्च-नीचत्वाचे थोतांड वाढवून स्पृश्यास्पृश्यतेचे बंड माजविण्यात आले नसते, तर हिंदू तेवढा एक या भावनेने साऱ्या लोकांत एकी व प्रेम नांदले असते. आणि मग अशा वेळी हिंदू धर्माकडे व हिंदुस्थानकडे नुसत्या वाकडया नजरेने पाहण्याची छाती तरी कोणास कधी झाली असती काय? हिंदुधर्मास जर जिवंत ठेवावयाचे व हिंदराष्ट्रास जर स्वतंत्र करावयाचे तर देशातील अस्पृश्य समाजात विद्यार्जनाची वाढ ही केलीच पाहिजे; असा त्यांनी पक्का निश्चय केला आणि इ. सन १८५१ साली त्यांनी पुणे मुक्कामी नानांच्या पेठेत एकदाची अस्पृश्यांची पहिली शाळा घातली.

त्याकाळी अस्पृश्यांच्या नुसत्या सावलीचा विटाळ कोणास खपत नसे; तर मग अस्पृश्योद्धार झाला पाहिजे असे तोंडाने कबूल करणार तरी कोण? ज्योतिराव बोलत त्याप्रमाणे कृतीही करीत आणि म्हणूनच आधुनिक सुधारकांत आज त्यांची मुख्यस्थानी गणना होते. ज्योतिरावांनी आपल्या विहीरीवर व हौदावर पाणी भरण्याकरिता इ.स. १८५१ साली अस्पृश्य लोकांना परवानगी दिली. ज्योतिरावांचा तो हौद पुण्यास अजूनही “फुल्यांचा हौद " म्हणून गंज पेठेत प्रसिद्ध आहे.
 
समाजात पुनर्विवाहाची चाल रूढ झाली पाहिजे, याकरता त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यांच्या परिश्रमाने इ.स. १८६४ साली पुण्यास गोखल्यांच्या बागेत शेवटी शेवणी जातीत रघुनाथ जनार्दन व नर्मदा या दोघांत महाराष्ट्रातील पहिला पुनर्विवाह घडून आला व पुढे ही पुनर्विवाहाची चाल चोहोकडे हळूहळू रूढ होऊ लागली! गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, रा. भांडारकर, रा. ब. मदन श्रीकृष्ण, रा. नवरंगे, रा. परमानंद व रा. तुकाराम तात्या पडवळ, या सद् गृहस्थानी वरील कामी ज्योतिरावांना बरीच मदत केली. ज्योतिरावांच्या हातून राष्ट्रात अखंड असा लांबवर प्रकाश पाडणारी जी दिव्य ज्योत उत्पन्न झाली ती म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना ही होय. सत्यशोधक समाजाची प्रमुख तीन तत्त्वे होती.

( १) ईश्वर एक असून तो सर्वव्यापी , निर्विकार , निर्गुण व सत्यरूप आहे आणि सर्व मानव प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत.

( २) ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे. आईस संतुष्ट करण्यास अगर बापास विनवण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरूर नसते , त्याप्रमाणे सर्वसाक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास  दलालाची आवश्यकता नाही.

( ३) कोणीही जातीने श्रेष्ठ ठरत नसून फक्त गुणाने श्रेष्ठ ठरतो.
 
हिंदुस्तानात इंग्रजांची सत्ता सुरु झाल्यानंतर इंग्रजी विद्येचे दुध प्यालेल्या सुशिक्षितांच्या पहिल्या पिढीतून प्रथम जर कोणी हिंदभूमीच्या स्वराज्याचा व स्वातंत्र्याचा टाहो फोडला असेल तर तो ज्योतिराव फुले यांनी होय! ज्यावेळी ज्योतिरावांनी आपल्या जन्मभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी इंग्रजी राजसत्तेविरुद्ध बंड उभारण्याचा निश्चय केला होता त्यावेळी देशात इंडियन नॅशनल कॉग्रेसचा जन्मही झाला नव्हता. इतकेच नव्हे तर कॉग्रेसच्या जन्माच्या चाळीस वर्षे अगोदर ज्योतिरावांनी हे धाडस योजिले होते.

आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात ज्योतिरावांचा जो अपमान झाला तो त्यांना गिळता आला नाही. त्याने त्यांच्या विचारात मोठी क्रांती घडली! त्यांना कळून आले की, आपल्या मायभूमीत वर्गभेदांचे, धर्मभेदांचे व जातीभेदांचे मोठे थोरले बंड माजले असून त्यायोगे सामाजिक विषमता, मानसिक दौर्बल्य व गुलामीवृत्ती निर्माण झाली आहे व त्यायोगे देशातील क्षात्रतेजास शिथिलता आली आहे, तसेच लोकांत बेकी, आळस व अज्ञान पसरले आहे; आणि त्यामुळेच देश इंग्रजांना सहजासहजी पादाक्रांत करता आला आहे; अशा स्थितीत आपण स्वदेश स्वातंत्र्याकरिता जे बंडाचे निशाण उभारले आहे त्यात आपणाला कदापीही यश येणार नाही. स्वदेशहितासाठी, बंड उभारणे हा यशस्वी व हितकारी उपाय नसून या बदललेल्या मनूत इंग्रजी राज्याबरोबर या देशात आलेल्या अनेक पाश्चात्य सुधारणा येथे रुजवून त्याद्वारे देशाला उन्नत केल्याने आपला देश पुढे अल्पकाळात स्वतंत्र होईल त्याशिवाय दुसरा यशाचा मार्ग नाही, अशी त्यांची यापूर्वीच खात्री पटली होती आणि म्हणून बंडाचा विचार सोडून अनेक आधुनिक सुधारणा आपल्या देशातील जनतेत घडवून आणण्याची पराकाष्ठा ते अहोरात्र करीत राहिले व त्यात लोक चळवळ सुरू करून मोठे यश संपादन केले.
 
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*अभिवादक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment