Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, April 1, 2023

रामनवमी हा चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस

*श्रीराम नवमी*

रामनवमी हा चैत्र महिन्यातली शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस.


             
श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडके दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.
श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या - कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.
श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.
श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजाजनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.
मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.
ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.
======================
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
======================

No comments:

Post a Comment