*श्रीनिवास रामानुजन*
*थोडक्यात जीवन परिचय....*
*श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; - कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. त्यांच्या वडिलांचे नाव के. श्रीनिवास व आईचे नाव कोमलताम्मा तसेच पत्नीचे नाव एस जानकीअम्मा होते* .
*या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणम माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले*.
*रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' असं सांगितलं*.
*१२३+१३=१७२९आणि १०३+९३=१७२९*.
*तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी - रामानुजन संख्या म्हटले जात* .
*१९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत*.
*रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर १०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता . तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती* .
*मृत्यू*
*१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले*.
--------------------------
#माहितीस्तोत्र Wikipedia
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
--------------------------
No comments:
Post a Comment