" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

होळी या सणा निमित्ताने लिहलेला लेख


*गावातल्या होळीची मजाच वेगळी*


होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची.त्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्‍या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा समावेश असे. आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्‍या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्‍या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्‍या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्‍या मंडळी कडून भारे घेऊन होळीला देत असत. ही सगळी लाकडे आणि गवर्‍या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत जेष्ठ काका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे. हे  मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्‍या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे.

मग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा करायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. मान्यवरांकडुन एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्‍या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो.

होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्‍यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.होळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा.काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा.

होळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे वयाने मोठे व नोकरी निमित्ताने बाहेर गेल्यावर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं. तेव्हा पासून ज्या ठिकाणी आम्ही होळी साजरी करायची त्या ठिकाणच्या स्थळाला होळी चौक म्हणून ओळखतात. आजता गायत हा होळी चौक ब्राह्मण गल्ली उदगीर सर्वांना माहित व हा चौक परिचित आहे. 

*होळीचे महत्व*

हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच एक रंगाचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपलाय तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.

दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच.

जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...