Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, September 22, 2023

आली आली गौराई सोन्या रुपयाच्या पावलांन..! आली आली गौराई धन धान्याच्या पावलानं

*आली आली गौराई सोन्या रुपयाच्या पावलांन..! आली आली गौराई धन धान्याच्या पावलांन..!* 

सोन्यामोत्यांच्या पावली , आली अंगणी गौराई, पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई, अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया घरा दारा लाभो सदा कृपेची छाया. 
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राण प्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरीचे त्यापाठोपाठ आगमन होते.
रुणुझुणुत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, घाली लिंबलोण सडा..’ गौरींवर रचलेल्या अशा विविध गाण्यांचा गजर करत तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी प्रत्येक स्त्री गौरीचं थाटामाटात स्वागत करते, कारण ती माहेरवाशीण असते ना!
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. आज गुरुवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत ते तिच्या विसर्जनापर्यंत सारं काही पाहण्याजोगं असतं. खण, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, देवीहार, लक्ष्मीहार, वगैरे शृंगाराने सजलेली ही माहेरवाशिणी प्रत्येकाच्या घरी आणण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणाकडे खडय़ाच्या गौरी आणतात, कोणाकडे तेरडय़ाची, कोणाच्या घरी उभ्या गौरी तर कोणाकडे बैठय़ा. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, तर काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिनहाताच्या असतात. गौर काहींच्या घरी गणपतीची आई म्हणून, तर काहींच्या घरी गणपतीची बायको म्हणून आणली जाते. 
खडय़ाच्या गौर मुख्यत्वेकरून कोकणस्थ लोकांकडे आणल्या जातात. एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. पाणवठय़ावर एखादी जागा स्वच्छ करून तिथे या गौरी ठेवून तिची पूजा व आरती करतात. त्यांना प्रसाद दाखवला जातो. यानंतर गौरी आणणारी जी माहेरवाशीण असेल तिने तोंडात पाण्याची चूळ भरून रस्ताभर ती चूळ न टाकता मुक्या तोंडाने गौरी घरात आणायच्या असतात. 
खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या अगर मुलीच्या हातात ताम्हण किंवा तांब्या असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद-कुंकू लावून तिला ओवाळून मग घरात घेतात. म्हणजेच गौरीला सोनपावलांनी दारातून आत घेऊन येतात. गौरी आणणाऱ्या मुलीने याच पावलांवर पाय ठेवून आत यायचे असते. आत आणल्यानंतर प्रथम गौरीला धान्याचे कोठार, स्वयंपाकाची खोली, नंतर सारे घर दिव्याच्या प्रकाशात दाखवले जाते. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून, खडे ठेवून त्याची हळद-कुंकू, आघाडा, दुर्वा, फुलं, गेजवस्त्र यांनी पूजा करतात. दमून आलेल्या लाडक्या माहेरवाशिणीसाठी पहिल्या दिवशी शेपूची भाजी, भाकरी हा मुख्य जेवणाचा बेत केला जातो. दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवायला बोलावून तिला विडा, दक्षिणा द्यायची पद्धत आहे. बायकांना दुपारी हळदी-कुंकवास बोलावले जाते. या दिवशी गौरीला घावनघाटल्याचा नवेद्य दाखवला जातो. सोबत पुरण, तळण व खीर इ. पदार्थाचा समावेश असतो. तिसरा दिवस विसर्जनाचा. या दिवशी गौरीला नवेद्याला गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नवेद्य दिला जातो. गौरी जाताना रांगोळी म्हणजे रुपयाची पाऊले रेखाटतात. गौरीच्या बरोबर दुपारच्या नवेद्याची शिदोरी किंवा दही-पोह्यंची शिदोरी दिली जाते. जातानाही मुकेपणानेच पाणवठय़ावर जाऊन तिथे पुन्हा एकदा आरती करून हळदी-कुंकू, अक्षता वाहून वाहत्या पाण्यात गौरींचं विसर्जन केलं जातं. 
देशस्थांकडे काहींच्या घरी बैठय़ा अथवा उभ्या गौरी बसवतात. यांच्याकडे गौरींचे मुखवटे घरच्या घरीच सांभाळून ठेवलेले असतात. हे मुखवटे पितळी, मातीचे अथवा शाडूचे असतात. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवतात. हे मुखवटे घरच्या सुना अथवा एक सासुरवाशिणी व माहेरवाशिणी अशा दोघी दारातून बाहेर जाऊन पुन्हा दारातून घरात आणतात. त्यानंतर दोघीही गौरीला घरातील तिजोरी, अन्नधान्याचे डबे इ. दाखवून ‘उदंड’ तसेच ‘गौरी आल्या सोन्याच्या पावली, महालक्ष्मी आल्या रुप्याच्या पावली’ असं म्हणण्याची पद्धत आहे.  अन्नधान्याचे डबे, धान्याचे कोठार, दुधाचे पातेले अशा ठिकाणी एकीने ‘इथे काय आहे’ विचारल्यावर दुसरीने ‘उदंड’ असं उत्तर द्यायचं असतं. धान्याची साठवण, दूध-दुभत्याचे भांडे तेथे असलेले ‘उदंड राहो’ असं त्यामागचा दृष्टिकोन मानला जातो. हे मुखवटे पितळी किंवा लाकडी स्टॅण्डवर बसवतात किंवा कोणी कोठय़ांना साडय़ा नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे, काही पितळी तर काही लाकडाचे असतात आणि काही ठिकाणी तर हात नसण्याची सुद्धा पद्धत असते. 
त्या दोन गौरींना जेष्ठा आणि कनिष्ठा असे संबोधले जाते. दोघींच्या मध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या आणि तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडून त्याच्यासमोर गव्हाचा चौक घालतात. त्यांना अलंकाराने मढवतात. त्यांना सजवण्यासाठी नवीन साडय़ा, मुकुट, गळ्यातील अलंकार, बांगडय़ा इत्यादींची जोरदार खरेदी झालेलीच असते. त्यामुळे नटल्यानंतरचा त्यांचा थाट, शृंगार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पहिल्या दिवशी भाजी-भाकरीच्या नवेद्याने गौराई तृप्त होते. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. काही लोक विसर्जनाच्या दिवशी ६४ योगिनीच्या फोटोलाही पूजतात. एका घागरीत पाणी भरून ती घागर कर्दळीच्या पानावर घवाच्या राशीवर काकडीच्या फोडी ठेवून त्यावर ठेवतात. तिच्यावर गंधाने ६४ योगिनी काढून त्यावर कलश ठेवून पूजा केली जाते. 

तेरडय़ाची गौर पूजनाची पद्धत ही काहीशी वेगळी आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा भागांत गौरी पूजनाची ही पद्धत बरेचदा आढळून येते. तेरडय़ाचा जुडा एकत्र बांधून पाणवठय़ाजवळ आंघोळ घालून तिची पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात तिचं आगमन केलं जातं. घरी आणल्यावर माहेरवाशिणीने गौरी आणली म्हणून तिने गौर घातली असं म्हटलं जातं. दारातून आत प्रवेश करताना जिने गौर आणली तिच्या पायावर पाणी घालून, हळदी-कुंकू, डोळ्याला पाणी लावून तिला ओवाळून उजव्या पायांनी तिचा घरात प्रवेश होतो. पाटावर अथवा चौरंगावर देवी बसवतात, त्यानंतर साडी नेसवून दागदागिने घालून तिला शेपू व भाकरीचा नवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौरींइतकाच शंकराचा मानही मोठा असतो. घरात शंकराचं आगमन होतं. शंकरालाही पानवठय़ाजवळ आरती करूनच वाजतगाजत घरी आणलं जात. या दिवशी पुरणपोळी आणि मिक्स भाजीचा नवेद्य दाखवला जातो. या दिवशी सुपात शंकर-गौरी दोघांनाही सजवून औसा पूजन केले जाते. तेरडय़ाला म्हणजेच गौरीला विडय़ाच्या पानाचे डोळे, नाक, ओठ काढून त्यात सोन्याचे मणीमंगळसूत्र, चांदीची जोडवी हे महत्त्वाचे दागिने परिधान करतात. तर शंकरालासुद्धा टोपी, शर्ट, उपरणं, धोतर नेसवून सजवलं जातं. भस्माने विडय़ाच्या पानाचे कान, नाक, डोळेही काढतात. त्यानंतर गौरी-गणपतीची आरती करून गौण नवेद्य दाखवला जातो. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना गौरीला औसा पूजन करावे लागते. सुपात दोऱ्याच्या गुंडय़ा गुंडाळून सुपात खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, आक्रोड, बदाम, खारीक, पाच तऱ्हेची फळं, पाच भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी सूप सजवून सुवासिनी ते सूप पाच वेळा गौरीभोवती ओवाळतात नंतर ते गौरीच्या पुढय़ात ठेवतात. गौरीला नमस्कार करून मनातील इच्छा बोलतात. औसायला आलेल्या त्या सुवासिनींची ज्यांचाकडे गौरी असते ते खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करतात. सुवासिनींच्या सुपातही पसे ठेवण्याची प्रथा आहे. रात्री गौर जागवतात. गौरीचे खेळ खेळले जातात. त्या वेळी काही स्त्रियांच्या अंगात गौर येते. त्या वेळी तिला कुठून आलीस, काय जेवलीस, असे प्रश्न विचारले जातात. गौरी विसर्जनाच्या दिवशी तिच्या पायांवर पाणी ओतून तिची दृष्ट काढली जाते. त्यानंतर तेरडय़ाची डहाळी घरावर टाकली जाते. सोबत गौरी विसर्जनानंतर पाच खडेही घरावर टाकले जातात. 
गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. 
अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र हा  सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने गौरी आवाहन, पुजन व विसर्जन साजरा करतात 
----------------------------
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
-----------------------------



No comments:

Post a Comment