Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, April 22, 2023

संत महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक

*संत महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक*

तत्कालीन मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११३१ साली वैशाख शुद्ध तृतीया, (अक्षय्य तृतीया) या दिवशी वीरशैव प्रतिष्ठित कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला ११३१ला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका होते. महात्मा बसवेश्वरांच्या मोठ्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव अक्कानागम्मा होते. वयाच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळविण्यासाठी ते कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे गेले, ते वीरशैव प्राचीन अध्ययन केंद्र होते. तेथे महात्मा बसवेश्वरांनी काही वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले. महात्मा बसवण्णांनी जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली. त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती सहज साधी आणि सोपी आहे. संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. ते घरोघरी जात. शरणूशरणार्थी करत. शरण कक्कय्या, हरळय्या, चेन्नय्या, नुलीय चंदय्या, मडिवाळ माचीदेव, व घटीवाळय्या या कष्टकरी, दीनदलित, आदिवासी, अठरा आलुतेदार, बारा बलुतेदार, यांना बसवण्णा एकत्र करू लागले. त्यांना सहज साधे जीवन तत्त्वज्ञान सांगू लागली एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे. एकत्र या चर्चा करा. सुसंवाद करा. स्त्रियांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. कोंबडे-बकरे कापू नका. स्वकष्टावर जगा. भिक्षा मागून खाऊ नका. काम कष्ट करा. कायकात कैलास आहे. दासोह समाजसेवा आहे. पर्यावरण रक्षण करा. दगडधोंडे पुजू नका. पुरोहिताच्याहस्ते देवपूजा करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका. यज्ञ, होम-हवन करु नका. अनुभव मंटपात बसा. प्रश्न उत्तर करा, चर्चा करा. वचन साहित्य द्या. शुभाशुभ पाहू नका. नदी-स्नान करू नका. एकमेकांच्या पाया पडू नका. शरणूशरणार्थी म्हणा. संन्यासवादाचे उदात्तीकरण करू नका. संसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका. मांसाहार करू नका व्यसनाधीन बनू नका. चोरी करु नका. हत्या करु नका. रागावू नका. खोटे बोलू नका. कोणाची घृणा करु नका. दया हाच धर्म आहे. सदाचाराने वागा. निती-नैतिकता आणि विवेकाने वागा. दयाच धर्माचा मूलमंत्र आहे. शरणांची थट्टा मस्करी करू नका. नवस-सायास करू नका. अंधश्रद्धा सोडून द्या. प्राणीमात्रावर दया करा. भुकेलेल्याला अन्न द्या. घोर जपतप करू नका. झोपच जप आहे. कठोर देहदंडण, इंद्रियदमन करू नका. देहाला कष्ट देऊ नका. देह कायकासाठी कष्टवा. उपवास-तापास, व्रतवैकल्ये करू नका. वेळेवर दिवस वर्ष यात भेद करू नका. प्रत्येक दिवस, वार शुभच आहे. मरण महानवमी आहे, त्याचे स्वागत करा. सुखी संसार करा, संसार सोडून हिमालयात जाऊ नका. संन्यास धारण करण्याची गरज नाही. मूर्तिपूजा सोडून द्या. अनावश्यक खर्च करू नका. काल्पनिक स्वर्ग-नरक यावर विश्वास ठेवू नका. सदाचार स्वर्ग आहे. अनाचार नरक आहे. देवघर गाव सोडून अन्यत्र भटकू नका. शेत पावनभूमी आहे. कष्टाची भाकरच महाप्रसाद आहे. जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागाची पूजा करू नका, विसंगत व्यवहार सोडून द्या. निसर्गनियमाप्रमाणे देहधर्माप्रमाणे वागा. अनावश्यक देहाला त्रास देऊ नका. चारित्र्य सांभाळा. दासोह करा. गरजेपुरती संपत्ती बाळगू नका. फुकटचे कोणाला काही देऊ नका. फुकटचे कोणाचे काही घेऊ नका. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी शिकवण बसवण्णांनी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖






No comments:

Post a Comment