Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 10, 2022

मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री


*मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री*

मौलाना अबुल कलाम आझाद
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी इस्लाम धर्मीयांचे पवित्र स्थान मक्का येथे झाला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक सुप्रसिद्ध विद्वान म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद प्रसिद्ध होते. त्यांचे मूळ नाव मोहीउद्दिन अहमद असे होते.अब्दुल कलाम याचा अर्थ वाचस्पती. वाचस्पती ही त्यांची पदवी होती. मौलाना अबुल कलाम आझाद हे लेखक,कवी आणि पत्रकार होते.
इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये सतत भांडणे होतील आणि त्या भांडणांमध्ये ते गुंतुन पडतील असे धोरण ठेवले होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अशा प्रकारची तेढ कमी होण्यासाठी जाणीवपूर्वक  लेखणी हाती घेऊन प्रयत्न केले. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या विचारांवर मौलाना अबुल कलाम आझाद यांची प्रचंड श्रद्धा होती. खिलाफत चळवळीमध्ये सुद्धा महात्मा गांधीजींच्या बरोबर राहून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी एक राजकीय नेते म्हणून आपला ठसा उमटवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सर्वात कमी वयाचे आणि तरुण अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध पावले. सन 1940 आणि 1945 या दोन्ही वेळी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होते. 1912 यावर्षी त्यांनी अल हिलाल हे वर्तमानपत्र सुरू करून मुस्लिम युवकांना स्वतंत्र चळवळीकडे आणि आधुनिक विचाराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रोत्साहन दिले.
मौलाना अबुल कलाम आझाद हे एक शिक्षण तज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांची लेखणी आणि वाणी अतिशय सुंदर पद्धतीने कार्य करीत असे. मौलाना अबुल कलाम आझाद हे भाषाप्रभू होते त्यांचे उर्दू,फारसी, अरबी, इंग्रजी व हिंदी या भाषांवर उत्कृष्ट प्रभुत्व होते. जे शिक्षण एखादा सामान्य मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी पूर्ण करतो ते त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच पूर्ण केले होते. लेखन कौशल्यातील योगदानामुळे आणि सामाजिक कामामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना शिक्षणमंत्री म्हणून समाविष्ट केले. ते जवळजवळ अकरा वर्षे भारताचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. एक शिक्षण मंत्री म्हणून हा कालखंड फार मोठा आहे. इतका मोठा काळ शिक्षणमंत्री पदावर यानंतर कोणालाही मिळाला नाही.मौलाना अबुल कलाम आझाद संसदेवर दोन वेळा निवडून गेले होते.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षणमंत्री असताना आय. आय. टी, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, भारतीय साहित्य अकादमी, विद्यापीठ अनुदान आयोग, ललित कला अकादमी, संगीत नाटक अकादमी इत्यादी संस्थांची पायाभरणी केली. या संस्था चांगल्या प्रकारे चालू होऊन त्यान नावारूपाला आणल्या. या संस्थांमुळे भारताच्या शिक्षण क्षेत्राला एक चांगले वळण मिळाले. आजही या संस्था अतिशय चांगल्या प्रकारे आपले कार्य करत आहेत.
या संस्थांच्या स्थापनेत मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान निश्चितच संस्मरणीय आहे. शिक्षण, संस्कृती, साहित्य, कला या गोष्टींमध्ये एक शिक्षण मंत्री म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यामुळे गौरवाने घेतले जाऊ लागले. त्यांना पारंपारिक इस्लामी शिक्षण पद्धती विशेष आवडली नाही त्यामुळे सर सय्यद अहमद यांच्या सारख्या विचारवंतांनी दिलेल्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी विश्वास ठेवला.
वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, मुलींचे शिक्षण तांत्रिक शिक्षण शेतीविषयक प्रशिक्षणे यांचे ते समर्थक होते. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
“इंडिया विन्स फ्रीडम” हे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे आत्मचरित्र आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटनांचे साक्षीदार म्हणून या पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दास्ताने करबला, गुब्बारे खातिर, तजकीराह ही त्यांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. आपल्या विविध ग्रंथांमधून कलामांनी मानवतेचा संदेश दिला आहे. त्यांचा पवित्र कुराण इस्लाम धर्माच्या धर्मग्रंथांचा खूप अभ्यास होता.
पवित्र कुराणातील मानवतावादी विचार ते मांडत असत. इंग्रजी भाषेतील आधुनिक साहित्याचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता.
मौलाना अब्दुल कलाम आझाद एक राष्ट्रीय नेते होते. त्यांनी जीनांच्या मुस्लिम लीग ने मांडलेल्या द्विराष्ट्रवादी सिद्धांताचा कडाडून विरोध केला. भारताची फाळणी त्यांना मान्य नव्हती. भारताची एकात्मता आणि राष्ट्रीय अखंडता त्यांना हवी होती.विभाजनवादी तत्त्वांचा त्यांनी नेहमीच विरोध केला. त्यांनी आपल्या जीवनकार्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. आणि ते पैगंबरवासी झाले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील तसेच राष्ट्रीय एकात्मतेमधील महान कार्याबद्दल भारत सरकारने 26 जानेवारी 1992 रोजी भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान दिला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा फार मोठा गौरव केला.
11 नोव्हेंबर 2011 पासून मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात आहे. हाही त्यांचा एक बहुमानच आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment